(गणपतीपुळे / वैभव पवार)
देवरुख येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी आणि पुमसे स्पर्धेत खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात शानदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य पदकांसह उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
देवरुख येथे दि. १०, ११ आणि १२ जुलै रोजी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी प्रथमच खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शाळेत तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले होते. अवघ्या चार महिन्यांच्या सरावानंतर विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शाळेचे एकूण १३ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अमृता जोशी हिने सुवर्णपदक पटकावले, तर स्वरा काळे, राजवर्धन कल्याणकर आणि चिन्मय जाधव यांनी रौप्य पदक मिळवले. तसेच परी हळदणकर आणि रुद्र राजवाडकर यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र कांस्यपदक थोडक्यात हुकल्याने त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याशिवाय रिया साठे, कनक घावरे, त्रिशा कदम, स्मित वाघमारे, स्मित नरळकर, पवन चौघुले आणि आयुष जंगम यांनीही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या सर्व विद्यार्थ्यांना मालगुंड तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक रुपेश तावडे तसेच शाळेचे शिक्षक हेरंब प्रसाद भिडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन वैद्य, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बाळ जोग, मुख्याध्यापक आशिष वासावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
खंडाळा परिसरातील पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींमधूनही विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक होत आहे.

