(रत्नागिरी)
गणपतीपुळे येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरमधील ३४ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव इरफान झाकीरहुसेन जमादार (वय ३४, रा. हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान जमादार आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. १६ एप्रिल २०२५ रोजी, ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे जात असताना भंडारपुळे गावाजवळ कृष्णकुंज हॉटेलच्या परिसरात समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले. यावेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे इरफान समुद्रात ओढला गेला.
घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जयगड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.