(नवी दिल्ली)
कोरोना महामारीनंतर आता जगासमोर आणखी एका धोकादायक विषाणूचं संकट उभं ठाकलं आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं देशभरात हाय-अलर्ट जारी केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळं आणि बंदरांवर कडक स्क्रिनिंग सुरू करण्यात आलं असून, उच्च-जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जात आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) आणि विमानतळ आरोग्य संघटनांनी यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांना इबोला प्रभावित देश म्हणून घोषित करण्यात आलं असून, या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विशेष तपासणी सुरू आहे.
ताप, उलट्या, रक्तस्त्रावाची लक्षणं दिसल्यास तात्काळ माहिती द्या
आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, या देशांमधून अलीकडेच प्रवास केलेल्या प्रवाशांना ताप, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब, घसादुखी किंवा अस्पष्ट रक्तस्त्राव यांसारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच, संशयित किंवा निश्चित इबोला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि संबंधित माहिती प्रशासनाला द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतात आल्यानंतर 21 दिवस विशेष दक्षता
आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे की, इबोला विषाणूचा सुप्त कालावधी २१ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळे भारतात आल्यानंतर पुढील २१ दिवसांत कोणतीही लक्षणं जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांना अलीकडील प्रवासाची माहिती देणंही आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विमानतळांवर निगराणी वाढवली
आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार देशातील विमानतळांवर आरोग्य तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. विमानतळ आरोग्य कक्ष, निगराणी पथकं आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाधित भागांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
भारतात अद्याप एकही रुग्ण नाही
दरम्यान, पुण्य सलीला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, भारतात अद्याप इबोला विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटना यांनी इबोलाला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत.
आफ्रिका खंडात पसरत असलेल्या जीवघेण्या ‘इबोला’ (Ebola) व्हायरसच्या संकटामुळे भारत आणि आफ्रिकन युनियनने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २८ ते ३१ मे २०२६ दरम्यान नवी दिल्लीत होणारी चौथी ‘भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद’ (IAFS) काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या परिषदेची नवीन तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने काँगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. डब्लूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्रेकामुळे आतापर्यंत १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ५०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.

