(रत्नागिरी / वार्ताहर)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘कर्तव्य जागर फेस्ट २०२६-२७’ अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ‘१००० झाडे लावण्याचा संकल्प’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज (मंगळवारी) पोदार इंटरनॅशनल स्कूल, कारवांचीवाडी येथे उत्साहात करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि रोटरी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देतानाच झाडांची योग्य पद्धतीने लागवड आणि संगोपन कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. खड्डा तयार करण्यापासून रोपांची लागवड, माती भरणे, कंपोस्ट खताचा योग्य वापर आणि लागवडीनंतर झाडांची काळजी कशी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी “झाडांवर प्रेम करा… झाडेही तुमच्यावर प्रेम करतील” हा संदेश देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या इव्हेंट चेअर रोटे. माधुरी कळंबटे यांनी उपक्रमाचे प्रभावी नियोजन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, वाढते प्रदूषण आणि वृक्षसंवर्धनाची सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव रोटे. आनंद चौगुले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड, ज्येष्ठ रोटेरियन धरमसीभाई चौहान, विजय पवार, विनायक हातखंबकर, तन्वी साळुंखे, प्रसाद हातखंबकर, सचिन जाधव तसेच शाळेच्या शिक्षिका आर्वी पाटील उपस्थित होत्या.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘१००० झाडे लावण्याचा संकल्प’ या उपक्रमांतर्गत आगामी काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा व्यापक सहभाग मिळविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

