(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर शहर आणि परिसरात मांस व मटण विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
आषाढी यात्रेदरम्यान दररोज लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात दाखल होत असतात. या धार्मिक वातावरणात भाविकांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावना अबाधित राहाव्यात, तसेच यात्रेच्या पावित्र्याचे जतन व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, १५ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात मांस आणि मटणाची विक्री करण्यास मनाई राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
वारकऱ्यांसाठी ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस
दरम्यान, आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीची सोय अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पंढरपूर आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला आणखी काही नवीन बस उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून धार्मिक वातावरण कायम राखणे आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, मांसविक्रीवरील बंदी आणि नव्या एसटी बसची उपलब्धता या दोन्ही निर्णयांचे वारकरी व भाविकांकडून स्वागत होत आहे.

