(खेड / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील उद्योगांसमोरील विविध अडचणी आणि विकासाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी स्थानिक उद्योजक व कारखानदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करणाऱ्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत एमआयडीसी परिसरातील अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाढता पाणीटंचाईचा प्रश्न, उद्योगांच्या विस्तारातील अडथळे तसेच विविध प्रशासकीय अडचणी यावर उद्योजकांनी आपली मते मांडली. उद्योग क्षेत्रासमोरील समस्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.
उद्योजकांशी संवाद साधताना आमदार प्रमोद जठार यांनी त्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि “मीच तुमचा पालक आमदार आहे,” असे सांगत उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत आणि पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप नेते तथा माजी खेड नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजयुमो रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद (दादू) नांदगांवकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह लोटे एमआयडीसीतील अनेक उद्योजक आणि कारखानदार उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित उद्योजकांनी उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. उद्योगांसमोरील मूलभूत समस्या सोडवून लोटे एमआयडीसी अधिक सक्षम आणि उद्योगस्नेही बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

