(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सायबर यंत्रणेकडून मिळालेल्या एका संकेतावर विश्वास ठेवून, दापोली पोलिसांनी दाखवलेली धावपळ, संवेदनशीलता आणि वेळेवरची कृती एका तरुणाचे प्राण वाचवणारी ठरली. फेसबुकवर आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आणि तातडीने हालचाली सुरू झाल्या. पोलिसांच्या या सत्वर कारवाईने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाला पुन्हा जीवनाच्या प्रवाहात आणले.
११ जुलै २०२५ रोजी, रत्नागिरी जिल्ह्यातील सायबर पोलिसांकडे एक मोबाईल क्रमांकावरून प्रसारित झालेल्या एका व्हिडीओबाबत माहिती मिळाली. हा व्हिडीओ पाहता संबंधित युवक आत्महत्या करत असल्याचा आभास निर्माण झाला होता. ही माहिती गंभीर असल्यामुळे, तात्काळ दापोली पोलिस निरीक्षक महेश तोरसकर स्वतः पथकासह घटनास्थळी रवाना झाले. प्राथमिक पोलिस तपासातून समोर आले की, व्हिडीओत दिसणारा युवक प्रेमचंद नथ्थू शर्मा नसून, त्या क्रमांकाचा वापर त्याचा पूर्वीचा सहकारी जंगबहादूर रणविर सिंग करत होता. मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेला जंगबहादुर रणविर सिंग सध्या दापोलीत काळकाईकोंड येथील बापू गायकवाड चाळीत वास्तव्यास होता. त्याला तात्काळ शोधून काढण्यात आले.
चौकशीत जंगबहादुर रणविर सिंगने सांगितले की, त्याने घरगुती वादातून संतप्त होऊन आणि आई-वडिलांना धाक दाखवण्यासाठी आत्महत्येचा बनाव करत व्हिडीओ चित्रीत केला होता. हा व्हिडीओ फक्त कुटुंबीयांना दाखवण्यासाठी होता, मात्र मोबाईलचा योग्य तांत्रिक वापर न समजल्यामुळे तो चुकून फेसबुकवर अपलोड झाला. यामुळे समाजमाध्यमांवर एकच खळबळ उडाली होती.
जंगबहादुरने मोबाईलवर देखील एक भावनिक आणि व्यथित करणारा स्टेट्स ठेवला होता. त्यात लिहिले होते की, “मरते मरते मर जा रहा हूं पर यह बता रहा हूं भगवान भी तुम्हें माफ नहीं करेगा जितना मेरे को सताया है ना मेरे घर वाले को पिछवाड़े में अपने घर को भी छोड़ दिया हूं तुम्हारे पीछे ठीक है आज मेरे कोई नहीं है और में खुद ही बोल रहा हूं किसी की मैं इज्जत खराब नहीं करने वाला हूं इसलिए मैं खुद आत्महत्या कर रहा हूं अपने जैसे मैं सबको समझ रहा हूं ठीक है अपनी बहन जैसे किसी को अपना तो ब्लैकमेलिंग की धमकी ना कोई धमकी मैं खुद आत्महत्या कर रहा हूं” या शब्दांतून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज येतो. एकटेपणा, तणाव आणि हतबलता यांनी ग्रासलेला हा युवक, त्याच्या वेदना व्यक्त करत होता. कुणावरही थेट आरोप न करता, त्याने अप्रत्यक्षपणे एका व्यक्तीविषयी मनातील खदखद शब्दांत मांडली होती.
दापोली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे उदाहरणं प्रस्थापित केले. युवकाचे समुपदेशन करण्यात आले. त्याला आश्वस्त करण्यात आले की, कोणत्याही अडचणीत पोलीस मदतीला तयार असतील. त्याची मानसिक स्थिती आता स्थिर असून, त्याने लेखी स्वरूपात भविष्यात अशा कोणत्याही टोकाच्या निर्णयापासून दूर राहण्याचा विश्वास पोलिसांना दिला आहे. या संपूर्ण मोहिमेत स्थानिक रहिवासी सचिन जाधव, उमेश पवार आणि इतर नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला, अशी भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.
पोलिसांची ‘माणूस’ म्हणून भूमिका
पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आणि त्यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता ही केवळ कर्तव्यनिष्ठेची नव्हे, तर माणुसकीची चमकदार ओळख आहे. सायबर कक्षामार्फत आलेल्या एका इशाऱ्यावर तातडीने कारवाई करत, वेळ न दवडता त्यांनी जीवन रक्षणाचे कार्य केले. अशा वेळेस कायद्यानुसार कारवाई करणे अपेक्षित असतेच, पण त्या युवकाचा हात धरून त्याला जीवनाकडे परत नेणे हे जे काम पोलिसांनी केले, ते सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. ही घटना हे स्पष्ट करत आहे की, पोलीस दल हे फक्त नियंत्रण, कायदा आणि शिस्तीपुरते मर्यादित नसून, समाजासाठी सजग, सहृदय आणि मदतीस तत्पर अशी एक विश्वासार्ह यंत्रणा आहे. त्यांची वेळेवरची कृती, सजगतेची संवेदना आणि माणुसकीची ज्योत अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल.
मन हेलावणारी जाणीव… आणि शिकवण
कधी कधी समाजमाध्यमांवरील एक पोस्ट किंवा एक व्हिडीओ किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे हे ठळक उदाहरण. अशा प्रसंगी संवेदनशीलतेने केलेली कृती मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेले जीवन वाचवू शकते. दापोली पोलिसांनी दाखवलेली ही सृजनशील तत्परता केवळ पोलिसिंग नाही, ती आहे जीवनमूल्यांची जपणूक. त्यांचे हे काम समाजाच्या मनात पोलीस दलाबद्दलचा विश्वास दृढ करणारा आणि त्यांच्या कार्याची उच्चतम मानवतावादी ओळख समोर ठेवणारे ठरले आहे.