(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीक भाट्ये पुलाच्या चढावाला सुरुवात होण्यापूर्वीच रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा कित्येक महिन्यांपासून जैसे थे आहे. वाहनचालकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या खड्ड्याची साधी डागडुजी करण्याची तसदीही संबंधित विभागाने घेतलेली नाही. एखाद्या निष्पाप वाहनचालकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
भाट्ये पुलाकडून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर असलेला हा खड्डा वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्याचा मोठा धोका आहे. वाहनांचा वेग, पुलाचा चढाव आणि अचानक समोर येणारा खड्डा यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी तर हा खड्डा अधिक धोकादायक ठरू शकतो. विशेष म्हणजे, हा खड्डा आज-काल पडलेला नसून कित्येक महिन्यांपासून त्याच अवस्थेत आहे. रोज या मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि नागरिक हा धोका अनुभवत आहेत. मात्र, संबंधित विभागाच्या निदर्शनास हा खड्डा अद्याप आलेला नाही की निदर्शनास येऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविणे ही संबंधित यंत्रणेची मूलभूत जबाबदारी असताना त्यासाठीही कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागत असेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे नेमके मोजमाप करायचे तरी कशावर? एखादा गंभीर अपघात घडून जीवितहानी झाल्यानंतरच या खड्ड्याची दखल घेतली जाणार का? की नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा फाईलवरील नोंदी आणि कागदी कारभारालाच अधिक महत्त्व आहे? या खड्ड्याच्या दुरुस्तीला नेमका कोणता मुहूर्त हवा आहे, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांमध्ये उपरोधिक चर्चा सुरू आहे. ‘पुलाखालून भुयार वगैरे काढायचे आहे काय? म्हणून खड्डा कित्येक महिने तसाच ठेवला आहे?’ अशी मिश्किल टीकाही होत आहे. मात्र, या टीकेमागील वास्तव गंभीर आहे. सार्वजनिक रस्त्यावरील धोकादायक खड्डा बुजविण्यासाठी एखाद्याच्या अपघातग्रस्त होण्याची किंवा जीव जाण्याची वाट पाहणे ही प्रशासनासाठी निश्चितच भूषणावह बाब नाही. संबंधित विभागाने आता तरी जागे होऊन हा खड्डा तातडीने बुजवावा आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.


