(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या कबड्डी दिन सोहळ्याला यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाचीही आकर्षक जोड मिळणार आहे. या निमित्ताने ‘गोष्ट वारीची’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता देसाई बँक्वेट हॉल, हॉटेल विवेक, माळनाका, रत्नागिरी येथे सादर होणार आहे.
मुंबईस्थित वन म्युझिक हाऊस निर्मित हा कार्यक्रम वारकरी परंपरेचे सांस्कृतिक वैभव रंगमंचावर साकार करणारा आहे. अभंग, कीर्तन, गोंधळ, जागरण आणि बतावणी या लोककलांच्या माध्यमातून वारीची परंपरा गायन, नृत्य आणि वादनाच्या सुरेल संगमातून रसिकांसमोर उलगडली जाणार आहे.
आषाढी वारीचा भक्तिमय अनुभव, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती यांचा संगम या कार्यक्रमातून रसिकांना ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रोहित सरनोबत आणि आदित्य कावले यांची निर्मिती असलेला हा सांस्कृतिक सोहळा कबड्डी दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. क्रीडा आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कबड्डी दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासह हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने क्रीडाप्रेमींसोबतच कला, संगीत आणि वारकरी परंपरेचे चाहते यांच्यासाठीही हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

