(जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळ आयोजित शैक्षणिक सहल गोवा या ठिकाणी दिनांक 12 व 13 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित विज्ञानप्रेमी शिक्षकांना यामध्ये सहभागी करण्यात आले.
या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे गोवा म्हटले की बीच, चर्च आणि मंदिरे नजरे समोर येतात परंतु या गोष्टींना बगल देत अभ्यास आणि मनोरंजन या दोन्हींचा समन्वय साधून गोव्यातील डॉ सलीम अली बर्ड सॅंक्चुअरी, कांदळवन, सायन्स सेंटर, नेव्हल एव्हिएशन म्युझियम आणि रोजच्या तणावपूर्ण धकाधकीच्या जीवनशैलीतून रिलॅक्स होण्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून क्रूझ सफारी अशा अनोख्या सहलीचे आयोजन अशी स्तुत्य कामगिरी रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाने यशस्वीपणे पार पाडली.
कोणत्याही कार्याची यशस्वीता ही त्या कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर आणि अर्थातच त्या विभागाचे विभाग प्रमुख यांच्या शिस्तबद्ध नियोजनावर अवलंबून असते. तद्वतच रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री विजयानंद निवेंडकर, उपाध्यक्ष सौ संघमित्रा कुरतडकर आणि तालुका विज्ञान मंडळ कार्यकारिणी यांच्या पुढाकाराने ही सहल यशस्वी झाली. या सहलीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या समवेत प्रियांका चव्हाण, अनघा रसाळ, राजश्री पाटील, इम्तियाज सिद्दिकी, आनंद खांडेकर, दत्तात्रय वीरकर, दिगंबर किंजले, केदार मुळे आणि अभिजीत जोशी शिक्षक सहभागी झाले. प्रतिवर्षी अशी शैक्षणिक सहल सर्व विज्ञानप्रेमी शिक्षकांसाठी आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.