(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा २६ वा कबड्डी दिन आणि कबड्डीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत उद्या बुधवारी (दि. १५) भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने हा सोहळा दुपारी ३ ते सायंकाळी ८ या वेळेत देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल, माळनाका, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते आणि पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर, आमदार भाई जगताप, आमदार किरण (भैय्या) सामंत, असोसिएशनचे प्रभारी सहकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे, रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह राज्यभरातील अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जीवनगौरव पुरस्काराने दिग्गजांचा सन्मान
यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ सांगलीचे दिनकर पाटील आणि पुण्याच्या शकुंतला खटावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. कबड्डीच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव
कबड्डी खेळाच्या प्रसारासाठी सातत्याने योगदान देणारे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर तसेच दैनिक सकाळचे प्रतिनिधी अल्ताफ कडकाले यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार, श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, श्रेष्ठ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार, उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व गौरव, ज्येष्ठ पंच पुरस्कार, ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार अशा विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय उदयोन्मुख कबड्डीपटू शिष्यवृत्ती पुरस्कार किशोर, किशोरी, कुमार आणि कुमारी गटातील गुणवंत खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच विशेष शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या खेळाडूंचाही गौरव केला जाणार आहे.
रत्नागिरीच्या खेळाडूंचाही होणार सन्मान
रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदानंद जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार, सूरज राठोड यांना उदयोन्मुख कबड्डीपटू शिष्यवृत्ती पुरस्कार, तर विलास सावंत यांना उत्कृष्ट पंच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
कबड्डीला नवी दिशा देणारा सोहळा
राज्यभरातील कबड्डीपटू, प्रशिक्षक, पंच, संघटक आणि क्रीडाप्रेमी यांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा सोहळा कबड्डीच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी क्रीडाप्रेमींना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, “पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनातून आयोजित हा राज्यस्तरीय सोहळा कबड्डीला नवी ऊर्जा देणारा ठरेल. राज्यभरातील अनेक मान्यवर आणि खेळाडूंचा सन्मान होत असल्याने हा कार्यक्रम कबड्डी क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरेल.”

