(रत्नागिरी / वार्ताहर)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे वैभव अधिक व्यापक करण्यासाठी दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविणे, वाचन संस्कृती जोपासणे आणि विविध बोलीभाषांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मराठीचे अभिजातपण जपतानाच तिला ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करणे आणि जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक दृढ करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा समारोप झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अंकलगे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार (सर्वसाधारण) बजरंग चौगुले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठीच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये मराठी भाषा केंद्रे उभारणे, विविध बोलीभाषांमधील साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आणि या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणे आवश्यक आहे, असे अंकलगे यांनी सांगितले.
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. कार्यालयीन कामकाज, दैनंदिन व्यवहार आणि संवादात मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे. इतर भाषा शिकताना मराठीची उपेक्षा होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. संत ज्ञानेश्वरांसह अनेक संत आणि साहित्यिकांनी समृद्ध केलेला मराठी भाषेचा वारसा जपत तिला शिक्षण आणि संशोधनाची भाषा बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशासकीय कामकाजातही वाचन संस्कृती जोपासा
प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विभागीय परीक्षांच्या पुस्तकांसोबतच श्रीकर परदेशी यांचे ‘महसूल मार्गदर्शिका’ आणि सी. डी. देशमुख यांचे ‘माझी प्रशासकीय कारकीर्द’ यांसारख्या पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थानिक बोलीभाषा आणि संस्कृतीचा आदर राखणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ पुस्तके वाचणे, नऊ कविता ऐकणे किंवा नऊ पुस्तके भेट देणे अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांतून मराठी भाषेची गोडी वाढवावी आणि तिच्या समृद्धीसाठी संकल्प करावा, असे आवाहनही रजपूत यांनी केले.


