(खेड / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेड यांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या गुणगौरव सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या गुणवंतांचा होणार गौरव
कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या शिक्षक पाल्यांचा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच जेईई (JEE), नीट (NEET), बीडीएस, एमटीएस आदी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय डॉक्टर, अभियंते, वकील, पदवीधर, पदव्युत्तर आणि उच्च शिक्षण पूर्ण केलेले शिक्षक पाल्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यस्तरीय यश मिळविणारे विद्यार्थी यांचाही सत्कार होणार आहे.
शिक्षकांचाही होणार सन्मान
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षक, शैक्षणिक अर्हता वाढविणारे शिक्षक, नव्याने नियुक्त झालेले केंद्रप्रमुख, निवृत्त शिक्षक तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचाही या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
नोंदणीचे आवाहन
सन्मानासाठी पात्र असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी शैलेश पराडकर, श्रीकृष्ण खांडेकर, नितीन साळुंखे, निलेश कांदेकर, रविकिरण फुंदे, संतोष बर्वे, दिनेश पवार आणि धोंडूराम मिसाळ यांच्याकडे करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या गुणगौरव सोहळ्यास तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर आणि दिलीप यादव यांनी केले आहे.

