(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरीजवळील ‘रत्नसागर बीच रिसॉर्ट’ वादप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा प्रशासनाने दाद मागितली असून, न्यायालयाने प्रशासनाला २९ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी जिल्हा न्यायालयाने कठोर भूमिका घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नुकसानभरपाई अदा करावी, अन्यथा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात जिल्हा प्रशासनाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
‘रत्नसागर बीच रिसॉर्ट’ संदर्भातील हा खटला गेल्या काही महिन्यांपासून गाजत असून, स्थानिक पातळीवर मोठ्या उत्सुकतेने त्याकडे पाहिले जात आहे. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनंतर या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

