(राजापूर / तुषार पाचलकर)
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि ग्रामीण रुग्णालय रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी (Oral Health Check-up), ज्येष्ठ नागरिकांसाठी जेरियाट्रिक आरोग्य सेवा (Geriatric Care), उपशामनात्मक उपचार सेवा (Palliative Care), प्रयोगशाळा तपासण्या (Lab Tests) तसेच एक्स-रे (X-ray) आदी सुविधांचा समावेश आहे.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी, आजारांचे निदान आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

