(गणपतीपुळे / वैभव पवार)
पर्यटनस्थळ गणपतीपुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळे यांच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिकसह विविध प्रकारच्या कचऱ्याच्या तब्बल ४२ बॅग संकलित करण्यात आल्या.
या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांची होती. मोहिमेचे उद्घाटन पोलीस अधिकारी श्री. गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य निरीक्षक राजेंद्र रणसे, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) मनाली तारवे, आरोग्य सेवक विक्रम जाधव, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आशा सेविका, ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सर्वांच्या संयुक्त सहभागातून एमटीडीसी (MTDC) गेट ते कपिल लॉज या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी “स्वच्छ गणपतीपुळे – सुंदर गणपतीपुळे” हा संदेश देत पर्यटक आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, असे आवाहन करण्यात आले.
गणपतीपुळे हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन आणि धार्मिक स्थळ असल्याने परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक राखण्यासाठी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि डॉ. ऋषिकेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

