(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गंभीर जखमी अवस्थेतील एक बैल मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचल बाजारपेठेसह परिसरात हा बैल जखमी अवस्थेत फिरत असून त्याच्या शरीरावरील जखमा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या बैलाच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त करत त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची मागणी केली आहे. याबाबतची पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर संबंधित बैल हा मूळ पांगरी गावचे व विद्यानगर पाचल येथे वास्तव्यास असलेल्या श्रीधर जाधव यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार दिवसांपासून संबंधित मालकाशी संपर्क साधून बैलावर उपचार करण्याबाबत विनंती करण्यात येत होती. सुरुवातीला “उपचार करतो”, “घरी घेऊन जातो” अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, आता संबंधित बैल माझा नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. बाबालाल फरास यांनी संबंधितांना लेखी नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सदर बैल जखमी अवस्थेत असून त्याच्या एका शिंगाला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वेळेवर उपचार न झाल्याने जखमेत किडे पडत असल्याचीही माहिती नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.
तसेच उपचारासाठी पकडण्याचा प्रयत्न केल्यास बैल आक्रमक होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात या जनावरामुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाल्यास संबंधित मालक जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ग्रामस्थांकडून पोलीस प्रशासन आणि संबंधित मालकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत. मात्र, नेमकी कारवाई कोणत्या विभागाने करावी याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कठोर निर्णय जाहीर केले होते. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पत्रकार आणि नागरिकांकडून आता संबंधित मालकावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

