(राजापूर)
राजापूर ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांनंतर प्रथमच यशस्वीपणे पाच जनरल शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या पाच रुग्णांपैकी चार लहान मुलांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या असून, पुढील काळात महिन्यातून एक ते दोन वेळा अशा शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया बंद असल्याने, तालुक्यातील रुग्णांना लहान-मोठ्या ऑपरेशनसाठी रत्नागिरी तसेच खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र शुक्रवारी आयोजित शस्त्रक्रिया शिबिरामुळे हा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागला आहे.
या शिबिरात एकूण पाच जनरल शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह सर्जन डॉ. गुरव आणि डॉ. घोसाळकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. भुलतज्ञ म्हणून डॉ. जमशेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरमहा शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन
यापुढे राजापूर ग्रामीण रुग्णालयात दर महिन्याला एक ते दोन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, लहान मुलांचे लघवीवाटेचे आजार तसेच इतर जनरल शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मेस्त्री यांनी केले आहे.
नोंदणी आणि पुढील योजना
रुग्णालयात शस्त्रक्रियांसाठी नोंदणी आणि फिटनेस तपासणी दररोज सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. यासोबतच आठवड्यातून दोन दिवस नियमित सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, यासाठी रत्नागिरी येथील एक-दोन भुलतज्ञांना राजापूर येथे पॅनलवर घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही डॉ. मेस्त्री यांनी दिली.
राजापूर ग्रामीण रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया सुरू झाल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

