(रत्नागिरी / वार्ताहर)
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार, दि. १५ जुलै रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शिबिरामध्ये विविध आजारांची प्राथमिक तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान होण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत जनआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सहज, सुलभ आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

