(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
बनावट आरटीओ ई-चलनाच्या नावाखाली घडलेल्या सायबर फसवणुकीत गमावलेले तीन लाख रुपये अवघ्या काही दिवसांत परत मिळवून देत राजापूर पोलिसांनी तांत्रिक तपासातील कौशल्याची प्रचिती दिली आहे. या प्रकरणात पुणे व परिसरातील पाच संशयितांची भूमिका निष्पन्न झाली असून, या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार शादाब अन्सारी अद्याप पोलिसांच्या रडारवर आहे.
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्याशी संबंधित ही घटना १६ एप्रिल २०२६ रोजी घडली. त्यांच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर आरटीओ ई-चलनाच्या नावाने एक बनावट लिंक पाठविण्यात आली होती. ती लिंक उघडल्यानंतर मोबाईलवर आलेल्या आधार प्रमाणीकरणाशी संबंधित ओटीपी प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातून तब्बल तीन लाख रुपये परस्पर डेबिट केल्याचे उघड झाले. फसवणुकीची बाब लक्षात येताच ॲड. खलिफे यांनी तातडीने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवरही माहिती देत त्वरित दाद मागितली. या तत्परतेमुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली.
पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत असताना ही रक्कम पुण्यातील एका फिनकॉर्प कंपनीच्या कर्ज खात्यात वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपनिरीक्षक मोबीन शेख यांच्या पथकाने पुणे गाठत मितेश जालींदर वाघुले, किरण मच्छिंद्र नेहरकर, विजय काशीनाथ व्होरहाडे, दत्तात्रय गंगाराम गवारी आणि गंधार संजय रत्नपारखी यांची भूमिका तपासात निष्पन्न केली. प्राथमिक चौकशीत कमिशनच्या मोबदल्यात इतरांच्या नावावर उघडलेल्या कर्ज खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीचे व्यवहार केले जात असल्याचे समोर आले आहे.
तांत्रिक पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची सांगड घालत पोलिसांनी तत्पर हालचाली केल्या आणि फसवणुकीची संपूर्ण तीन लाख रुपयांची रक्कम ॲड. जमीर खलिफे यांच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात यश मिळविले. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांतील आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने राजापूर पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख तसेच पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार आणि दीपक काळे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या सायबर रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार शादाब अन्सारी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांचे आवाहन
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, अनोळखी लिंक, ई-चलनाचे संदेश किंवा एपीके फाईल्स उघडू नयेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा गोपनीय आर्थिक तपशील इतरांशी शेअर करू नयेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी नागरिकांना केले आहे.

