(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत यशस्वी होऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महासंघाचे अध्यक्ष आयु. भास्करराव कुरतडकर यांनी भूषवले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वकिल राकेश सत्वे उपस्थित होते.
समारंभ रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
विचारमंचावर कार्याध्यक्ष जे.पी. जाधव, एम.बी. कांबळे, सेक्रेटरी शरद कांबळे, सुधाकर कांबळे, श्री. मोहिते, अनंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शरद कांबळे यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक अनंत जाधव यांनी केले.
या प्रसंगी तालुका बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश पवार, प्रा. आयु. रविचंद्र कांबळे, मा. एम.बी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शनपर विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक वकिल राकेश सत्वे यांनी आपल्या प्रभावी भाषणात डॉ. आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाने आदर्श अधिकारी व नागरीक होण्याचे आवाहन केले. “भारतीय संविधान बदल घडविण्यास शिकवते, बदला घेण्यास नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आयु. भास्करराव कुरतडकर म्हणाले, “उच्च शिक्षण घेऊन मोक्याच्या पदांवर विराजमान व्हा; पण कोकणभूमीत शेती, आंबा, काजू, नारळ, केळी, फणस आदी पिकांवर आधारित उद्योग उभे करून आर्थिक स्वावलंबन साधा.” त्यांनी स्वतःच्या अनुभवातून शेती आणि परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
समारंभाची सांगता माजी नायब तहसीलदार एम.बी. कांबळे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. अखेरीस सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन झाल्याचे सर्वांनी कौतुक केले. गेल्या १३ वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असून समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

