(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील महसूल विभागाचा सावळागोंधळ, गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवणारा अन्नघोटाळा आणि शहरातील रखडलेले प्रश्न यावरून आता युवा क्रांती सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, युवा क्रांती सेनेच्या वतीने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर एक सविस्तर निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची महसूल मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती युवा क्रांती सेनेचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महसूल मंत्र्यांनी या संदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ आवश्यक ती पावले उचलून प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले असून, या अधिकृत पत्राची प्रतही संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये प्रामुख्याने रेशन दुकान, भूमी अभिलेख विभाग, कंत्राटी कामगारांचे शोषण आणि रेशन कार्ड संदर्भातील जाचक अटींवर प्रकाश टाकण्यात आला होता. रेशन कार्डवर नमूद करण्यात येणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, सध्या रेशन कार्डसाठी शहरी भागाकरिता अवघी ६० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जी अत्यंत अपुरी आहे. या व अशा अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर आता शासन स्तरावरून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे प्रशासकीय स्तरावर विविध कामांचे दावे केले जात असले, तरी रत्नागिरीतील अन्नघोटाळ्याचा प्रश्न आता पराकोटीला पोहोचला आहे. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, शाळेतील निष्पाप पाल्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यान्नात चक्क ‘चायनीज भेळ’ सारखे अयोग्य, आरोग्याला घातक आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे पुराव्यानिशी उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणासंदर्भात वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी थेट पत्रव्यवहार करण्यात आला असून, त्यांनी यावर योग्य तो पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, या कारवाईत प्रशासकीय यंत्रणेची ‘लाचलूचपत’ आणि ‘उदासीनता’ स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप युवा क्रांती सेनेने केला आहे. जेव्हा संबंधित यंत्रणेला पुराव्यांसह माहिती दिली जाते, तेव्हा तिथे तातडीने धाड टाकून गुन्हेगारांना पकडणे गरजेचे असते. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश किंवा फोन येण्यापूर्वीच ती संशयास्पद ठिकाणे बंद केली जातात, ही अत्यंत दुर्दैवी आणि संशयास्पद बाब आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांच्याकडे दाद मागण्यात आली असून, रत्नागिरीच्या अन्नविशोषक कार्यालयातून लवकरच अधिकृत कारवाईची दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
फेरीवाले आणि हातावर पोट असणाऱ्या गरीब घटकांसाठी नगर परिषदेने जाहीर केलेल्या ‘हॉकर्स झोन’च्या कामाची सध्या काय स्थिती आहे? याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने जाहीर सभा किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करावा, अशी जोरदार मागणी सचिन शिंदे यांनी केली. हॉकर्स झोन संदर्भात नेमकी काय कारवाई सुरू आहे, सर्वेक्षणाचे काम कुठपर्यंत आले आहे आणि सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांना याचा लाभ कधी आणि कसा मिळणार, याबाबत प्रशासनाने जनतेच्या दरबारात स्पष्टता मांडणे गरजेचे आहे. केवळ आश्वासनांची खैरात न करता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.
एमआयडीसीच्या प्रदूषणावरून पंकजा मुंडे यांच्याकडे साकडे
या पत्रकार परिषदेत केवळ नागरी प्रश्नच नव्हे, तर पर्यावरणाचा गंभीर मुद्दाही ऐरणीवर आणण्यात आला. रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातून होणाऱ्या वाढत्या रासायनिक आणि वायू प्रदूषणाचा मुद्दा युवा क्रांती सेनेने लावून धरला आहे. एमआयडीसीच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रशासकीय स्तरावर तसेच पंकजा मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस व कठोर उपाययोजना करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


