(रत्नागिरी)
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्या विविध प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी खतटंचाईबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
चालू खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यास एकूण १२ हजार ५५० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार ७३९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून, सध्या जिल्ह्यात ३ हजार ५२७.६६ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे.
युरियाचा ९० टक्के पुरवठा पूर्ण
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजअखेर पाच रेल्वे रेक आणि रस्ते वाहतुकीद्वारे जिल्ह्यात ५ हजार ९१६ मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. हा मंजूर आवंटनाच्या सुमारे ९० टक्के आहे. याशिवाय इतर विविध प्रकारच्या खतांचा २ हजार ८२३ मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे. आगामी काळात सहाव्या रेल्वे रेकद्वारे आणखी खतांचा पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांनी खत उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
५५० मेट्रिक टन बफर युरिया विक्रीसाठी खुला
पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना युरिया सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने विशेष उपाययोजना केली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २३ गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या ६४० मेट्रिक टन बफर युरिया साठ्यापैकी ५५० मेट्रिक टन साठा दोन टप्प्यांत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना युरिया सहज उपलब्ध होत आहे.
खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन
पिकांची निरोगी वाढ, अधिक उत्पादन आणि जमिनीची सुपीकता कायम राखण्यासाठी रासायनिक खतांचा, विशेषतः युरियाचा अतिवापर टाळावा. मृदा परीक्षण आणि शिफारशीनुसार संतुलित प्रमाणात खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्याबरोबरच जमिनीचे आरोग्यही चांगले राहते, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

