(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर २०२६ या महिन्याचे अन्नधान्य वाटप मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३७ हजार १६५ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक शिधापत्रिकेमागे २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू, असे एकूण ३५ किलो धान्य वितरित केले जाणार आहे. ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन वाघ यांनी दिली.
नोव्हेंबर महिन्यासाठी जिल्ह्याला एकूण ६६०.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७८.५० मेट्रिक टन गहू, अशा एकूण धान्यसाठ्याला मंजुरी मिळाली आहे. भारतीय अन्न महामंडळ (FCI), पनवेल येथून हा संपूर्ण धान्यसाठा उचलण्यात आला असून, संबंधित गोदामांपर्यंत तो पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुकानिहाय आणि गोदामनिहाय मंजूर धान्यसाठ्यानुसार, मंडणगड येथे १,५६१ कार्डधारकांसाठी २५.५० मेट्रिक टन तांदूळ आणि १८.५० मेट्रिक टन गहू मंजूर करण्यात आला आहे. दापोलीतील ३,२०४ कार्डधारकांसाठी ४७.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ३५ मेट्रिक टन गहू, तर खेडमधील ३,८७४ कार्डधारकांसाठी ७२ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७ मेट्रिक टन गहू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गुहागरमधील ३,२६० कार्डधारकांसाठी ५६.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४२ मेट्रिक टन गहू मंजूर झाला आहे. चिपळूणमध्ये ६,००९ कार्डधारकांसाठी सर्वाधिक १११ मेट्रिक टन तांदूळ आणि ८३ मेट्रिक टन गव्हाचे वाटप केले जाणार आहे.
संगमेश्वर गोदामातून ३,९७६ कार्डधारकांसाठी ६८.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४०.५० मेट्रिक टन गहू, तर देवरुख गोदामातून ३,०९८ कार्डधारकांसाठी ५५.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४५.५० मेट्रिक टन गहू वितरित केला जाणार आहे. रत्नागिरी गोदामासाठी २,७३० कार्डधारकांच्या वाटपाकरिता ४८ मेट्रिक टन तांदूळ आणि ३६ मेट्रिक टन गहू मंजूर करण्यात आला आहे.
जयगड गोदामातून १,२६६ कार्डधारकांना १९ मेट्रिक टन तांदूळ आणि १४.५० मेट्रिक टन गहू, तर पाली गोदामातून ५०१ कार्डधारकांना १० मेट्रिक टन तांदूळ आणि ७.५० मेट्रिक टन गहू दिला जाणार आहे. लांजा येथील ३,४५३ कार्डधारकांसाठी ६४ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७ मेट्रिक टन गहू मंजूर करण्यात आला आहे.
राजापूर गोदामातून ३,४६५ कार्डधारकांसाठी ६९.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ५२ मेट्रिक टन गहू, तर पाचल गोदामातून ७६८ कार्डधारकांसाठी १३.५० मेट्रिक टन तांदूळ आणि १० मेट्रिक टन गहू वितरित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी नोव्हेंबर महिन्याचे मंजूर धान्य आपल्या नजीकच्या रास्त भाव दुकानातून वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.


