(रत्नागिरी)
गणेशोत्सवाच्या उत्साहात असतानाच रत्नागिरी मंगळवारी पहाटे नाचणे परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने सर्वांना हादरवून सोडले. शांतीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या आईचा धारदार सुऱ्याने खून केला. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला.
या घटनेत पूजा शशिकांत तेली (४५, रा. एकता वसाहत, शांतीनगर, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मुलगा अनिकेत तेली (२५) याने वार केल्यानंतर स्वतःलाही गंभीर जखमी केले असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी मुलाला तातडीने रुग्णालयात हलवले.
या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद आणि कर्जाच्या तणावातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तपास सुरू असून लवकरच संपूर्ण या मागील कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गणेशोत्सवासारख्या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे नाचणे परिसरात आणि रत्नागिरी शहरात शोककळा पसरली आहे.

