(रत्नागिरी)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे आणखी एका देहदानातून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. नाचणे (रत्नागिरी) येथील कै. श्रीमती मंगल भालचंद्र जोगळेकर (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने १३ जुलै रोजी शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पूर्वसंमतीनुसार आणि कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. हे महाविद्यालयातील २१वे मरणोत्तर देहदान ठरले आहे.
कै. मंगल जोगळेकर यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाचा संकल्प नोंदविला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांची इच्छा पूर्ण करत देहदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. प्राची सावंत, जावई प्रदीप सावंत तसेच नातवंडे असा परिवार आहे. देहदानाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी आणि रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी देहदानाची प्रक्रिया पार पाडली.
या प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अतिदक्षता विभागाच्या अधिपरिचारिका प्राजक्ता कोरगांवकर तसेच सौरभ चित्ते यांचेही सहकार्य लाभले.
देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि भावी डॉक्टरांच्या प्रशिक्षणाला मोलाची मदत होत असल्याने, अशा सामाजिक जाणिवेच्या उपक्रमांमुळे समाजात देहदानाविषयी जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

