( रत्नागिरी / वार्ताहर )
शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मांडवी परिसरासह संपूर्ण रत्नागिरी शहरात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सुमारे आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना त्यांच्या घरी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासूनच मृदूभाषी, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या म्हणून परिचित होत्या. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मांडवी भागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील विविध विकासकामांसाठी योगदान दिले. जनसामान्यांशी असलेला त्यांचा स्नेह आणि आपुलकीचा स्वभाव यामुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांची अंत्ययात्रा आज (मंगळवारी) दुपारी १२ वाजता मांडवी येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार असून, मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय तसेच मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

