(रत्नागिरी)
कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “मृदसुत” गटाच्यावतीने दिनांक २६ जून २०२५ रोजी कोळंबे गावातील फणसवाडी येथे प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत फडणीस यांच्या शेतात नारळ खत व्यवस्थापन (रिंग पद्धत) व सुपारी बागेत मिरी आंतरपीक लागवड यांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात नारळाच्या झाडांसाठी रिंग पद्धतीने खत व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकाने झाली. यामध्ये ९:२४:२४ संमिश्र खत, युरिया आणि म्युरिएट ऑफ पोटॅश यांचा वापर करून खतांची मात्रा आणि वेळापत्रक याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बा. सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार, एका झाडासाठी वर्षभरात १००० ग्रॅम नायट्रोजन, ५०० ग्रॅम स्फुरद व २००० ग्रॅम पालाश देणे आवश्यक असून, यामध्ये स्फुरद जून महिन्यात एकदाच पूर्ण प्रमाणात दिला जातो, तर नायट्रोजन व पालाश हे जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी या तीन टप्प्यांमध्ये विभागून दिले जातात. यासोबतच जून महिन्यात प्रति झाड ५० किलो कंपोस्ट किंवा शेणखत देण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर सुपारीच्या बागेत मिरी (पन्नीयूर-१) आंतरपीक लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मिरी वेली सुपारीच्या खोडालगत आधार देऊन लावण्यात आल्या. या वेळी रोपांची निवड, योग्य अंतर, सुतळीचा आधार देणे, छायानियंत्रण, नियमित सिंचन आणि कीड-रोग नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रात्यक्षिकांमध्ये एकूण १३ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकतेने शंका विचारत अनुभवसिद्ध माहिती मिळवली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे केंद्रप्रमुख डॉ. किरण माळशे, विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी व कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
“मृदसुत” गटातील विद्यार्थी प्रणव देसाई, विजय दराडे, विपुल डोंगरकर, ओंकार फराडे, राजवर्धन गायकवाड, सुमित भादवे, वेदांत गिरी, सार्थक दिवाळे, आकाश गावडे आणि संकेत देशपांडे यांनी प्रात्यक्षिक आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नारळ व मिरीसारख्या नगदी पिकांचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन शिकण्याची संधी मिळाली असून, त्यातून अधिक उत्पादन व आर्थिक लाभ साधता येईल, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.