(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराजवळील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली असून रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. वाहने तर कसाबसा मार्ग काढत असली तरी प्रवाशांना बसणारा दणका असह्य ठरत आहे. या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमध्ये एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का? असा संतप्त सवाल खड्डे पाहून उपस्थित होत आहे. चर्मालय ते कोकणनगर हा रस्ता शाळकरी मुले, कार्यालयीन कर्मचारी, वृद्ध नागरिक आणि रुग्णवाहिका यांचा दैनंदिन मार्ग आहे. अशा जीवघेण्या अवस्थेतील रस्त्यांवरून प्रवास म्हणजे दररोजच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.
या भागात पाईपलाइन फुटणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून त्यानंतर करण्यात येणाऱ्या दुरुस्ती कामातील निष्काळजीपणा अधिक चिंताजनक ठरत आहे. कारण पाईपलाइन दुरुस्तीसाठी रस्ता खोदला जातो, परंतु काम पूर्ण झाल्यानंतर तोच रस्ता पूर्ववत करण्याबाबत आवश्यक ती तत्परता दिसून येत नाही. खोल खड्डे, सैल माती आणि असमतल पृष्ठभाग यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या चरांमधून जाताना मोठी कसरत करावी लागत असून, छोटासा दुर्लक्षही अपघातास कारणीभूत ठरू शकतो. सार्वजनिक कामे करताना केवळ समस्या दूर करणे पुरेसे नसते, तर त्यानंतर परिसर पूर्वस्थितीत आणणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र अनेकदा दुरुस्तीचे काम संपल्यानंतर संबंधित यंत्रणा खड्डे तसेच सोडून देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. समस्या एका बाजूने सोडवताना दुसऱ्या बाजूने नवी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अधिक जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम होणे आवश्यक आहे.
हा मार्ग काही गावांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ये- जा करत असताना खड्ड्यात गाडी गेली की ती वर येईलही, पण गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या मणक्याला बसणारा धक्का त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करत आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल आहेत की ते मृत्यूचे सापळेच वाटतात. रात्रीच्या अंधारात रस्ता अधिकच धोकादायक होतो. पण संबंधित यंत्रणा मात्र बिनधास्त झोपल्याचे सोंग घेऊन बसल्याचे चित्र आहे. संबंधित प्रशासनाकडून या समस्येकडे डोळेझाक न करता तत्काळ रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे.

