(रत्नागिरी)
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत इयत्ता सहावीच्या पुनर्रचित मराठी माध्यम अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात रत्नागिरी जिल्ह्यातील ९६ मराठी माध्यम शिक्षक, शिक्षण अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगावचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) रत्नागिरीचे प्राचार्य सुशील शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, अधिव्याख्याते लवू आचरेकर आणि श्री. लठ्ठे, तज्ज्ञ मार्गदर्शक सुहास शेल्ये, मोहन बापट, सुहास वाडेकर, संजना वारंग, नमिता वैद्य, प्रज्ञा खोब्रागडे, तसेच समन्वयक श्वेता कवितके आणि देवयानी पवार उपस्थित होत्या.
उद्घाटनपर भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाची संकल्पना, नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये तसेच विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनातील शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमाचीही माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. प्रशिक्षणासाठी परिषद दालन, वर्गखोल्या, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात उपलब्ध करून देण्यात आल्या असून, काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट, अध्यापन पद्धती, मूल्यमापन प्रक्रिया आणि कौशल्याधारित शिक्षणाची सखोल माहिती मिळणार आहे. त्यामुळे वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये समन्वय वाढून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासही या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण हातभार लागणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

