(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणच्या निसर्गसौंदर्याला साक्ष ठेवत सरत्या २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटकांसह स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यासह गणपतीपुळे, जयगड, नाटे, गुहागर तसेच दापोली तालुक्यातील हर्णे, लाडघर, मुरुड आणि अन्य किनाऱ्यांवर वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती. क्षितिजावर मावळणाऱ्या शेवटच्या सूर्यकिरणांना निरोप देताना अनेक चेहरे भावूक झाले, तर नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात तरुणाई ‘सेल्फी’ आणि जल्लोषात रममाण झाली होती.
नववर्षाच्या स्वागतासाठी किनारपट्टीवर विविध सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटताना जिल्हाभरातील हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट्स आणि होमस्टे ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, गणपतीपुळे व अन्य लोकप्रिय पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागला. कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ख्रिसमसची सुट्टी, गुलाबी थंडी आणि नववर्ष स्वागत यांचा संगम साधत गेल्या काही दिवसांपासून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक व्यावसायिक, खानावळी, घोडागाडी चालक यांच्यासाठी हे दिवस सुगीचे ठरत आहेत.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता रत्नागिरी पोलिस प्रशासनाकडून भाट्ये समुद्रकिनाऱ्यासह सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, अतिउत्साही पर्यटक आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिक व पर्यटकांना नववर्षाचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पोलिस दल ‘अलर्ट’ मोडवर असून, संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाची करडी नजर कायम आहे.
दापोली तालुक्यात ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात थंडीचा कडाका जाणवत असून, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तापमान ७ ते ८ अंशांच्या आसपास स्थिर आहे. ३१ डिसेंबर रोजीही तापमान ८.३ अंशांवर नोंदवले गेले. ही गुलाबी थंडी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरली असून दापोलीतील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि घरगुती निवास व्यवस्था पूर्णपणे भरून गेले आहेत.

