(दापोली)
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची भारत सरकारच्या सरदार स्वर्णसिंग राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था (Sardar Swaran Singh National Institute of Bio-Energy – SSS-NIBE), कपूरथला (पंजाब) येथे महासंचालक (Director General) म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कोकण कृषी विद्यापीठासह महाराष्ट्राच्या कृषी व संशोधन क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था (SSS-NIBE) ही भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (Ministry of New and Renewable Energy – MNRE) अधिपत्याखाली कार्यरत असलेली देशातील अग्रगण्य संशोधन संस्था आहे. जैवऊर्जा संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास, प्रशिक्षण, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही संस्था पार पाडते.
डॉ. अतुल मोहोड यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. जैवऊर्जा, सेंद्रिय शेती, कृषी अवशेषांपासून ऊर्जा निर्मिती, शाश्वत कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताच्या विविध संशोधन प्रकल्पांमधील त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले असून, शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषी आणि ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा लाभ आता देशाच्या जैवऊर्जा संशोधनाला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. मोहोड यांची ही नियुक्ती केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून कोकण, महाराष्ट्र आणि देशातील कृषी व जैवऊर्जा संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जैवऊर्जा संशोधनाला नवी दिशा मिळेल तसेच शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. अतुल मोहोड यांच्या या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल शैक्षणिक, कृषी, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

