(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राज्यभरातील अधिकारी प्रामाणिकपणे कामाला लागल्याचे चित्र आहे. मात्र, रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन विभागाला बहुधा या कडक भूमिकेचा विसर पडला असावा किंवा कारवाईचे केवळ सोपस्कार पार पाडायचे असावेत. कारण, दापोलीत या विभागाने केलेली कारवाई पाहून अवैध गुटखा माफियांना धडकी भरण्याऐवजी हसूच आवरणार नाही. दापोलीतील केळसकर नाका येथे करण्यात आलेल्या या ‘महाभयंकर’ कारवाईत अधिकाऱ्यांनी तब्बल १६७८ रुपये (अक्षरी एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये मात्र) किंमतीचा गुटखा जप्त करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अन्न सुरक्षा विभागाने केळसकर नाका परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ६२ वर्षीय अशफाक महमूद मणियार (रा. दापोली) याच्यावर भारतीय अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी घातली असली तरी, राजरोसपणे याची विक्री सुरूच आहे. तपासादरम्यान आरोपीकडून वाहतूक आणि विक्रीसाठी ठेवलेला ‘विमल’ पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईची धाडसी निष्पत्ती म्हणजे अवघ्या १६७८ रुपयांचा मुद्देमाल!
सध्या राज्यात तुकाराम मुंढे यांच्या नावाची दहशत आहे. त्यांच्या आदेशान्वये राज्यातील अनेक जिल्ह्यांत प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून लाखोंचा अवैध गुटखा पकडला जात आहे. अशा वेळी, दापोलीत केलेली ही चिल्लर कारवाई केवळ वरिष्ठांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आणि कागदोपत्री ‘आम्ही काम करतोय’ हे दाखवण्यासाठीच असल्याचा संशय सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. लाखोंची उलाढाल करणाऱ्या मोठ्या गुटखा माफियांना अभय देऊन, एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाईचा फार्स करत रत्नागिरी अन्न व औषध प्रशासन विभाग नेमके काय साध्य करू पाहत आहे, हा खरा प्रश्न आहे.
प्रतिबंधित गुटखा आरोग्यास हानिकारक असल्याने प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचा दावा या कारवाईनंतर अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. पण १६७८ रुपयांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने दापोलीतील गुटखा तस्करांचे धाबे किती दणाणले असतील आणि नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित झाले असेल, हे प्रशासनानेच तपासून पाहण्याची गरज आहे. केवळ दिखाव्यासाठी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा रत्नागिरीतील अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा थोडा तरी आदर्श घ्यावा, अशीच अपेक्षा आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

