(दापोली)
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभू म्हणाले, कृषी क्षेत्रात अनेक आव्हाने असली तरी त्यांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता घडवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा आणि उत्पादन क्षेत्राचा आहे, असे सांगताना त्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी कृषी पदवीधरांना केले.
दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असली तरी त्यामध्येच संधी शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी स्वीकारावा, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठात सध्या ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून यंदा सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी भविष्यात विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विद्यापीठाला प्राप्त झालेल्या ‘अ’ दर्जाबद्दल सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके आणि पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.

