(दापोली)
दापोली तालुक्यातील विकासकामांना गती देणारा महत्त्वाचा उपक्रम म्हणून ओळखला जाणारा ‘विजय बंधारा’ प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ बुधवारी टाळसुरे येथे झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, टाळसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूर्वा सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी बंधाऱ्याच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकल्पांमुळे नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण सुलभ होते आणि शाश्वत विकासाला चालना मिळते.”
गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी ग्रामीण पातळीवरील सातत्यपूर्ण जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व स्पष्ट केले व ग्रामस्थांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
स्मार्ट ग्राम जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी झालेल्या मूल्यमापन समितीच्या भेटीदरम्यान उपकार्यकारी अधिकारी पाटील, दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी रेवाळे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर, ग्रामसेवक दिनेश मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथे समितीच्या स्वागताने झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय भेट, ‘विजय बंधारा’ प्रकल्पाचा शुभारंभ, घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे प्रदान करणे, तसेच गावातील विविध कामांचे प्रत्यक्ष मूल्यमापन अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

