(दापोली / प्रतिनिधी)
श्रम, सेवा आणि समर्पणाचा सन्मान करणारा श्रमजीवी परिवार (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांचा २० वा राज्यस्तरीय स्नेहसंमेलन व श्रमजीवी गौरव पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दापोली येथील रसिक रंजन नाट्यमंदिर येथे जल्लोषात आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला. राज्यभरातून आलेल्या मान्यवर, पुरस्कारार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण नाट्यमंदिर उत्साहाने फुलून गेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लोकशाहीर रत्नाकर दाजी महाकाळ यांच्या मराठी वाद्यवृंद सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
ज्येष्ठ साहित्यिक, संत वाङमयाचे गाढे अभ्यासक, व्याख्याते,माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. ॲड. धनराज वंजारी यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात मार्गदराशन करतांना “समाज घडवणारे शिक्षक, समाजसेवक आणि श्रमजीवी घटक हेच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यास दिलेली दाद आहे.”असून, दास क्षुद्रांची गुलामगिरीतून मुक्तीचा विचार या लेखक शरद पाटील यांच्या पुस्तकाचा दाखला देत, भारतीय समाजव्यवस्थेतील विषमता, गुलामगिरी आणि शोषण यावर परखड भाष्य करणारे लेखक शरद पाटील यांचे विचार आजही तितकेच सुसंगत आणि दिशादर्शक ठरतात असे सांगितले. “दास क्षुद्रांची गुलामगिरी” या संकल्पनेतून त्यांनी समाजातील श्रेणीव्यवस्था, सत्ताकेंद्रित अन्याय आणि त्यातून होणारी मानवी अवहेलना स्पष्ट केली आहे.
मतदानाचा अधिकार केवळ राजकीय हक्क नसून तो मानवी अस्तित्वाची जाणीव करून देणारा मूलभूत अधिकार आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले. “हा एका मताचा अधिकार माणसाला दिला तर त्याला जाणीव होईल की मी जनावर नसून मानव आहे,” असे सांगत त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना स्वाभिमानाने उभे राहण्याची ताकद दिली. त्यामुळेच मतदानाचा अधिकार हा आत्मसन्मानाचा आणि लोकशाहीचा कणा ठरतो.
शिक्षणाबाबतही केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून ते संस्कारक्षम असणे आवश्यक आहे. संस्कारक्षम शिक्षणातून जे आचरण घडते, त्यालाच संस्कृती म्हणतात, हा विचार समाजघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षणातून विवेक, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण झाली तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो असे सांगत मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करणाऱ्यांना उत्तर देताना, “कोण म्हणते मराठी संपेल? मराठी माती नव्याने फुलवायची आहे,” हा आशावादी विचार प्रेरणादायी ठरतो. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती, इतिहास आणि संघर्षांची साक्ष आहे. नव्या पिढीने मराठीला आधुनिकतेशी जोडत तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या सामाजिक वास्तवात परिवर्तनाची मशाल ठरतात. समता, स्वाभिमान, संस्कारक्षम शिक्षण आणि भाषेचे जतन यांच्या जोरावरच समाजाला गुलामगिरीतून मुक्तीकडे नेणे शक्य आहे.
त्यांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण मनोगतास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, समाजसेवक, उद्योजक व क्रीडा शिक्षकांना राज्यस्तरीय श्रमजीवी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना अनेक मान्यवर भावूक झाले, तर त्यांच्या मनोगतातून समाजासाठी काम करताना मिळालेला संघर्ष आणि समाधान व्यक्त झाले.
कार्यक्रमाला श्रमजीवी प्रमुख हरेश कावणकर,मा. श्री. प्रकाश कावणकर (मार्गदर्शक, श्रमजीवी परिवार), दशरथ पाटील, अर्जून खोत,पुरुषोत्तम मुळे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी महासंघाचे प्रतिनिधी श्री.गणेश देवघरकर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शांताराम शिंदे गुरूजी, तसेच रत्नागिरी, सांगली, रायगड, परभणी, पुणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुशांत जाधव, यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.तर आभार प्रदर्शन व समारोप रुपेश दीपक गमरे यांनी केला. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी आयोजित स्नेहभोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
दापोलीच्या भूमीत भरलेले हे स्नेहसंमेलन केवळ पुरस्कार वितरण न राहता, समाजकार्य, शिक्षण आणि श्रमसंस्कृतीचा उत्सव ठरले, अशी भावना उपस्थित नागरिकांतून व्यक्त होत होती.

