(खेड)
भोस्ते गावचे सुपुत्र, कोंकण रेल्वेच्या लेखा (अकाऊंट्स) विभागातील कर्मचारी तसेच राधाकृष्ण मंडळाचे कार्यकर्ते विनायक (बापू) विष्णू पणदेरे यांचे सोमवारी (दि. १३) रात्री मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भोस्ते गावासह मित्रपरिवार, सहकारी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विनायक पणदेरे यांनी कोंकण रेल्वेत खेड व चिपळूण स्थानकांवर वाणिज्य सहाय्यक म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर पदोन्नती होऊन ते लेखा विभागात कार्यरत होते. सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याच्या स्वभावामुळे त्यांनी सहकारी आणि प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी नातेवाईक, मित्र आणि सहकारी प्रार्थना करत होते. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
विशेष म्हणजे, अवघ्या चार ते पाच महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच विनायक पणदेरे यांच्या निधनाने कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भोस्ते गावातील सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. राधाकृष्ण मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी समाजकार्यात योगदान दिले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वांचे लाडके होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज (मंगळवारी, दि. १४) रोजी दुपारी १२ वाजता भोस्ते येथील विराचीवाडीतील राहत्या घरातून निघून भोस्ते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
“माणूस शरीराने दूर जातो, पण त्याची माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि जपलेल्या आठवणी कायम हृदयात जिवंत राहतात,” अशा शब्दांत मित्र परिवाराने विनायक (बापू) पणदेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

