(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लाखो रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या भूमीगत केबल आणि स्ट्रीट लाईट प्रकल्पातील कथित निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत मिऱ्या येथील शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. “आम्ही शॉक लागून मेल्यावरच महावितरण जागे होणार का?” असा संतप्त सवाल करत महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन देत महावितरणला माघार घ्यावी लागली.
महावितरण आणि खासगी ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून मिऱ्या परिसरात भूमीगत केबल आणि स्ट्रीट लाईटचे काम करण्यात आले. मात्र, सुरक्षेचे निकष पायदळी तुडवत हे काम केवळ कंत्राट पूर्ण करण्याच्या घाईत उरकल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘हाय टेन्शन’ आणि ‘लो टेन्शन’ वीजवाहिन्या नियमानुसार आवश्यक खोलीवर टाकणे बंधनकारक असतानाही त्या वरवरच पुरण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे फिडर आणि डीपी परिसरातील मुख्य विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या असून, केबलसाठी बसविण्यात आलेले लोखंडी बॉक्स अवघ्या काही दिवसांत गंजून उघडे पडले आहेत. परिणामी नागरिक आणि जनावरांना वारंवार विजेचा धक्का बसत असल्याचे प्रकार घडत असूनही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
मिऱ्या ग्रामपंचायतीने या धोकादायक परिस्थितीबाबत अनेकदा लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला. मात्र, महावितरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीने त्याची दखल घेतली नाही. अखेर संतप्त ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालय गाठत घोषणाबाजी केली. कार्यालयात पोहोचल्यानंतर महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आणि वरिष्ठ अधिकारी समोर येईपर्यंत माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला अधिकारी दालनातच थांबून आंदोलनाकडे पाठ फिरवत असल्याने वातावरण अधिकच तापले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बाहेर आणले.
अधिकारी समोर येताच ग्रामस्थांच्या रोषाचा जणू उद्रेकच झाला. “तुमच्या निष्काळजीपणामुळे आमच्या मुलांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एखादा बळी गेल्यावरच कारवाई करणार का?” अशा संतप्त शब्दांत महिलांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली. ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून अखेर महावितरणने नमती भूमिका घेतली. बुधवारी वरिष्ठ अधिकारी स्वतः मिऱ्या येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील, ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता तपासतील आणि उघड्या पडलेल्या केबल्ससह सर्व धोकादायक त्रुटींवर तातडीने उपाययोजना करतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मात्र, बुधवारची पाहणी केवळ औपचारिकता ठरली किंवा आश्वासनांची पुन्हा एकदा फसवणूक झाली, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा मिऱ्यावासीयांनी दिला आहे. त्यामुळे आता महावितरण प्रत्यक्ष कृती करते की पुन्हा आश्वासनांपुरतेच मर्यादित राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

