(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय अल्पवयीन आणि तरुणांना कट्टरतावादी विचारांकडे वळवून त्यांचा दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापर करण्याचा संशय व्यक्त होत असताना, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून चिपळूणमध्येही एटीएसने हालचाली सुरू केल्या असून, आतापर्यंत दोन संशयित तरुणांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुणापर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या १४ युनिटमधील तब्बल ५८ पथकांनी राज्यभर एकाच वेळी सुमारे १५० ठिकाणी समन्वित शोधमोहीम राबवली. प्राथमिक तपासात पाकिस्तानातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून भारतीय तरुणांशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संवेदनशील सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांचा आधार घेत तरुणांचे मानसिक प्रबोधन नव्हे, तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न या नेटवर्ककडून होत असल्याचा संशय आहे. ऑनलाइन प्रचार, वैयक्तिक संवाद आणि आर्थिक आमिष यांच्या माध्यमातून काही तरुणांना राष्ट्रविरोधी विचारसरणीकडे वळविण्याचे प्रयत्न झाल्याचे तपासात पुढे आले आहे.
तपास यंत्रणांच्या नोंदीनुसार, शहजाद भट्टीचे नाव भारतात अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रपुरवठा आणि घातपाताच्या कटांशी जोडले गेले आहे. तो सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पवयीन तरुणांना लक्ष्य करत असल्याचा संशय आहे. धार्मिक कट्टरता, झटपट पैसा आणि गुन्हेगारीच्या आकर्षणाचा वापर करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे तपासातून समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूणमधील दोन संशयितांना एटीएसच्या नवी मुंबई युनिटने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाईल फोनसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून, शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कशी संबंधित कोणतेही डिजिटल पुरावे किंवा संपर्क आढळतात का, याचा बारकाईने शोध घेतला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापरामुळे एटीएसबरोबरच राज्य पोलिसांच्या सायबर विभागानेही विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरील संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. मनोरंजन आणि संवादासाठी वापरली जाणारी समाजमाध्यमे काही गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कारवायांसाठीही वापरली जात असल्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. तपास यंत्रणांच्या मते, अशा नेटवर्कचे उद्दिष्ट केवळ ऑनलाइन प्रचारापुरते मर्यादित नसून, काही तरुणांना ‘स्लीपर सेल’ किंवा स्थानिक संपर्क म्हणून तयार करण्याचाही प्रयत्न असू शकतो. गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रपुरवठा आणि इतर गंभीर गुन्हेगारी कारवायांशी संबंधित धागेदोरेही तपासले जात आहेत.
या प्रकरणात चौकशी सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपासाचा विस्तार सुरू असल्याने अधिकृत माहितीशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तपास यंत्रणांकडून करण्यात आले आहे. एटीएसचे नवी मुंबई येथील पोलिस निरीक्षक विनय नरवणे यांनी पालकांना विशेष आवाहन करताना सांगितले की, मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियमित लक्ष ठेवणे, त्यांच्या ऑनलाइन संपर्कांविषयी जागरूक राहणे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधणे, ही काळाची गरज बनली आहे.

