(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज, शनिवार (२ मे २०२६) रोजी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा सुमारे १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
उत्तीर्णतेत मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारत ९३.१५ टक्के निकाल मिळवला, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के राहिला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर राहिली. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो राज्यातील सर्वात कमी ठरला आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात एकूण १५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच गुणपत्रकाची लिंकही सक्रिय करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी निकाल ५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता, तर यंदा तो तीन दिवस आधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. लाखो विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा करत होते. मंडळाने निकाल प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिल्याचेही स्पष्ट केले आहे.

