( रत्नागिरी )
रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कल्याण व मुंबई पथकाने चिपळूण येथे अवघ्या १२ तासांत अटक केली. महेश घाग ऊर्फ विक्की (रा. रत्नागिरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना इंदूर–दौंड एक्स्प्रेसमध्ये घडली. गुरुवारी (ता. १९) रात्री या गाडीतून प्रवास करत असलेल्या वृद्ध महिलेकडे सुमारे ३४ लाख ९८ हजार रुपयांचे सोनं, हिरे आणि रोख रक्कम असलेली पिशवी होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी ती उशाखाली ठेवली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २०) सकाळी कल्याण स्थानकात गाडी पोहोचल्यावर पिशवी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात आरोपी महेश घाग हा इंदूर एक्स्प्रेसमधून उतरताना संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असून तो सराईत चोर आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी चिपळूणमध्ये त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली. चौकशीत महेश घागने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली पिशवीही हस्तगत करण्यात आली आहे. या पिशवीत मोत्यांचा हार, हिऱ्याच्या बांगड्या, सोनसाखळ्या, अंगठ्या, महागडे घड्याळ आणि मोठी रोख रक्कम सापडली.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ आणि राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक सुधाकर सावंत तसेच हवालदार संदीप गायकवाड, स्मिता वसावे, राम जाधव, प्रमोद दिघे, अक्षय चव्हाण, रवींद्र ठाकूर, पद्मा केंजळे, मंगेश खाडे, विक्रम बावरेकर, देविदास अरण्ये, संदेश कोंडाळकर, अमोल अहिनवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.