(संगमेश्वर / एजाज पटेल)
घाम गाळून ज्या जमिनीला हिरवाईने नटवण्याचे स्वप्न बळीराजाने पाहिले, तीच जमीन आज पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसली आहे. आकाशातून बरसणाऱ्या पावसाने दडी मारल्याने संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावातील भातशेती गंभीर संकटात सापडली आहे. डोळ्यांदेखत उभे पीक करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, निसर्गाच्या अवकृपेने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे.
सर्वस्व पणाला लावून केली होती लावणी
हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी घरातील बचत, कष्टाने जमवलेली पुंजी आणि मोठ्या आशेने खरेदी केलेले बियाणे शेतात टाकले. चिखलात राबत, दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी भाताची लावणी केली. हिरवीगार डोलणारी रोपे पाहून यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांच्या मनात होती. मात्र, पिकाच्या वाढीच्या ऐन काळात पावसाने पाठ फिरवल्याने कोंडये गावातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कडक उन्हामुळे शेतातील जमीन भेगाळली असून, हिरवीगार दिसणारी भाताची रोपे आता पिवळी पडून सुकू लागली आहेत.
पाण्याचा पर्यायी स्रोत नसल्याने संकट अधिक गंभीर
पावसाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोंडये परिसरात शेताजवळ कोणताही मोठा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने शेतकरी इच्छा असूनही पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. जवळ नदी किंवा वाहता नाला असता तर मोटार किंवा पंपाच्या सहाय्याने पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्न करता आला असता. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी केवळ आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
एका भात पिकावर वर्षभराचा संसार
कोकणातील शेतकऱ्यांसाठी भातशेती म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, तर संपूर्ण वर्षाच्या जगण्याचा आधार आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार आणि कुटुंबाची गुजराण या पिकावर अवलंबून असते. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकरी कुटुंबांना सतावत आहे. कृषी विभागाने तातडीने कोंडये गावातील परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सुकलेली रोपे हातात घेताना माजी सरपंच भावुक
कोंडये गावचे माजी सरपंच आणि शेतकरी सुरेश दसम यांनी शेतातील सुकलेली भाताची रोपे हातात घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांची व्यथा मांडताना त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, “रात्रंदिवस मेहनत करून, रक्ताचं पाणी करून आम्ही हे पीक उभं केलं. पोराबाळांसारखी त्याची काळजी घेतली. मात्र आता आकाशात ढग दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीत. जवळ पाण्याचा स्रोत नसल्याने पीक वाचवण्याचा मार्गही उरलेला नाही. गावातील अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट आले आहे.”

