(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि मालगुंड गावच्या बारावाड्यांचे गावकर यशवंत उर्फ आप्पा लक्ष्मण कळंबटे यांचे आज (सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी) पहाटेच्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मालगुंड गावावर शोककळा पसरली.
यशवंत उर्फ आप्पा गावकर यांचा मालगुंड आणि मालगुंड च्या पंचक्रोशीतील जनतेशी दांडगा लोकसंपर्क होता.अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिका देवी आणि शिमगा व होळी उत्सव, पालखी या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख गावकर म्हणून कामगिरी निभावून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तसेच नमन व खेळे या कोकणी लोककलांमध्ये त्यांनी लोकप्रियता मिळवली. या लोकप्रिय कलांमध्ये उत्कृष्ट मृदंग वाजविण्याच्या कलेत त्यांनी हातखंडा निर्माण करून विशेष नावलौकिक मिळवला होता. त्याचबरोबर जाखडी कलेतील तुरेवाले शाहीर या जाखडी कला पथकांचे ते गुरुवर्य होते.
मालगुंड पंचक्रोशीत त्यांच्या तुरेवाले शाहीर म्हणून पाच शाखा कार्यरत आहेत. या सर्वच शाखांकडून त्यांचे गुरुवर्य म्हणून नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. त्यांचे विशेष म्हणजे आग्राडीवाडी आणि दुर्गवळीवाडी या दोन वाड्यांना कायमपणे एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी सर्वस्वी योगदान दिले. सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मालगुंड गावचे प्रमुख गावकर, नमन व खेळे लोककलेतील एक हरहुन्नरी कलाकार, जाखडी लोककलेतील तुरेवाले शाहिरांचे गुरुवर्य आणि आपल्या आग्राडी व दुर्गवळीवाडी या दोन्ही वाड्यांमधील लोकांना एकसंघ ठेवण्यासाठी निभावलेली मोठी कामगिरी अशा विविध अंगांनी त्यांनी आपले व्यक्तिमत्व साकारत आपल्या आयुष्याची कारकीर्द गाजवली.
त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये त्यांना पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गावातील व परिसरातील अनेक नेतेमंडळी ,सामाजिक कार्यकर्ते व गावातील विविध वाड्यांमधील अनेक ग्रामस्थांनी भेट देऊन श्रद्धांजली व्यक्त केली. तसेच प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आणि मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले झाले. यावेळी ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो अशा भावना व्यक्त करून सर्व जनसमुदायाने त्यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.
आप्पा कळंबटे यांच्या निधनाची वार्ता त्यांचे हितसंबंध असलेल्या अनेक मंडळींनी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मातब्बर मंडळींनी दूरध्वनीवरून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून तीव्र शोक व्यक्त केला आहे.

