( रत्नागिरी / प्रतिनिधी )
भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ते अधिक उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित असल्याने बाळ माने यांनी उद्धवसेनेत प्रवेश करण्याची तयारी केली होती. त्यानुसार बुधवारी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
अनेक वर्षे भाजपमध्ये काम करणा-या बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने एकमेकांसमोर निवडणुकीला उभे होते. त्यात बाळ माने यांचा पराभव झाला. त्यानंतर ते बराच काळ मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकांआधी ते पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला. लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते उत्सुक होते. तेथे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले.
भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. मात्र येथील आमदार महायुतीचाच असल्याने ही जागा शिंदे सेनेला म्हणजेच उदय सामंत यांना जाणार हे निश्चित होते. त्यामुळे बाळ माने यांनी उद्धव सेना किंवा अपक्ष असे मार्ग हाताळण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे साडू असलेले बाळ माने पितृपक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले.
त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत रत्नागिरीतील पदाधिका-यांनी माने यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे अलिकडेच पुन्हा एकदा सर्व स्थानिक पदाधिका-यांची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यात उमेदवारीबाबत त्यांची समजूत काढण्यात आली. बुधवारी माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव सेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार विनायक राऊत, माधवी माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव, बाळ माने यांचे सुपुत्र विराज आणि मिहीर माने उपस्थित होते.
उदय सामंतांना टक्कर देणारा तगडा उमेदवार मैदानात
महाविकास आघाडी म्हणून हा मतदार संघ शिवसेनेला (ठाकरे गट) सोडण्यात आला आहे. मात्र बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. उदय सामंत यांच्या समोर तगडा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने मैदानात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना या मतदार संघातून १० हजाराने कमी मताधिक्क्य मिळाल्याने त्याचा रोष त्यांनी सामंत कुटुंबीयांवर ठेवला आहे. त्याचा वचपा या निवडणुकीत निघेल की, महायुती म्हणून राणे कुटुंबीय सामंतांच्या मागे उभा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बाळ मानेंना जनता एकवेळ संधी देणार?
एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजप, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या तालुक्यात व्होटबँक आहेत. शिवसेना फुटीनंतर गाव खेड्यातील शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास ठेवणारा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार उदय सामंत यांना मोठा रोष या निवडणुकीत पत्करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे आता शिवसेना ठाकरे गटात दाखल होताच सामंत यांची आणखी डोकेदुखी वाढणार आहे. सामंत यांना मित्र पक्षाकडूनही मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील २० वर्षे उदय सामंत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी बाळ माने यांचा ३ वेळा पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीत बाळ माने हे ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. दबावतंत्र, साम-दामचा उपयोग करणे, विरोधकांना त्रास देणे सत्ताधारी पक्षालाही सोबत न घेणे अशा अनेक चुका प्रस्थापितांनी केल्या आहेत. विरोध करण्यासाठी सुद्धा शत्रूला शिल्लक ठेवायचे नाही, या नीतीमुळे आता रत्नागिरीत परिवर्तनासाठी माने यांना जनता संधी देणार की पुन्हा उदय सामंत यांना पाचवी टर्मही कायम ठेवणार हे आता निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.