(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) मध्ये सेथ थॉमस स्कूल, रत्नागिरी यांनी नेत्रदीपक यश संपादन करत १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे या यशामध्ये शाळेतील एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकला आहे.
इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेसाठी शाळेतील एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत कु. श्रेयस संतोष जाधव याने राज्य गुणवत्ता यादीत २१ वे स्थान मिळवण्याचा मान पटकावला. तसेच डिझाईन विषयात राज्यात तृतीय क्रमांक मिळवत त्याने शाळेच्या यशात भर घातली आहे. त्याचप्रमाणे एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ३० पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मॅनेजर फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, मार्गदर्शक कलाशिक्षक राहुल कळंबटे सर, शिक्षिका नेहा कांबळी मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे विशेषतः कु. श्रेयस जाधव याचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कला शिक्षणातील सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

