(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कुटुंब नियोजन, माता-बाल आरोग्य आणि लोकसंख्या स्थिरीकरणाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून संतुलित कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर जागतिक लोकसंख्या दिन तसेच लोकसंख्या स्थिरता सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव उपस्थित होते. याशिवाय जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. अतुल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हाने अधोरेखित केली. “दोन जन्मातील अंतर, कुटुंब सदृढ निरंतर” या घोषवाक्याचा संदर्भ देत त्यांनी कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा आणि शासनाकडून उपलब्ध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नियोजित कुटुंबामुळे माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सक्षम राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थी महिलांचा ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पुरुषांनीही पुरुष नसबंदीबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पुढाकार दाखविण्याची गरज व्यक्त केली. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष कांबळे यांनी केले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन सेवा, माता-बाल आरोग्य कार्यक्रम आणि विविध जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन डॉ. अतुल पाटील यांनी केले. पावस परिसरातील महिला, पुरुष आणि विविध स्तरांतील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकसंख्या स्थिरता, आरोग्यदायी कुटुंब आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

