(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आता वस्त्रसंहिता नियमावली लागू करण्यात आली आहे. श्रीदेव गणपतीपुळे संस्थान पंचकमिटीच्या निर्णयानंतर सर्व गणेशभक्तांना मंदिर परिसरात नियमात असलेले सुसंस्कृत आणि साजेशा वेशभूषेतच दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, “मंदिर हे अध्यात्मिकतेचे आणि हिंदू धर्माचे प्रमुख केंद्र आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र म्हणून पावित्र्य राखावे यासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताने सुसंस्कृत वेशभूषा धारण करावी, पूर्ण वस्त्र परिधान करावे, ही अपेक्षा आहे.”
गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी होत होती. आता पंचकमिटीच्या निर्णयामुळे ही मागणी पूर्ण झाली असून, भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अनेक धार्मिक आस्थापनांमध्ये आधीपासूनच वस्त्रसंहिता पाळली जाते, त्याच धर्तीवर गणपतीपुळे देवस्थानही हा नियम लागू करण्यात आला आहे.
श्री. घनवटकर यांनी पुढे सांगितले की, “आम्हाला खात्री आहे की सर्व गणेशभक्त या नियमावलीचे पालन करून देवस्थानाला सहकार्य करतील आणि मंगलमूर्तींचे मनोभावे दर्शन घेतील, अशी अपेक्षा आहे”

