(चिपळूण / रत्नागिरी)
चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तिवडी गावाचा तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वन विभाग आणि नागपूरस्थित खाजगी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या संयुक्त प्रयत्नातून गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या पुनरुज्जीवनासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
डोंगरदऱ्यांतून पाण्यासाठीची रोजची वणवण
तिवडी गावात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी ग्रामस्थांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना, सह्याद्रीतील कठीण डोंगर उतरून शेजारच्या गावांमध्ये जावे लागत होते. उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असून प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता.
अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाला गावाचा पाण्याचा आधार
गावातील ‘तळी’ म्हणून ओळखले जाणारे नैसर्गिक झऱ्याचे पारंपरिक कुंड हा गावाचा प्रमुख जलस्रोत होता. या झऱ्यामुळे वर्षभर पाणी उपलब्ध राहत असे आणि परिसरातील विहिरींची पाण्याची पातळीही कायम राहायची. मात्र, २०२१ मधील अतिवृष्टीमुळे या कुंडाचे बांधकाम पूर्णपणे ढासळले आणि त्यानंतर गावाचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर झाला.
तांत्रिक अडचणींवर CSRचा मार्ग
कुंडाची जागा खाजगी मालकीची असल्याने शासकीय निधीतून काम मंजूर करण्यात कायदेशीर व तांत्रिक अडचणी येत होत्या. वन विभागाने अनेक प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. अखेर गावाचे माजी सरपंच प्रकाश पवार यांनी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई (पाटील) आणि चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांच्याकडे पाठपुरावा केला.
गावाची गरज लक्षात घेऊन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी नागपूरस्थित लॉईड्स मेटल एनर्जी अँड ऋषभ मेटा इस्पात प्रा. लि. या कंपनीकडे CSR अंतर्गत प्रस्ताव सादर केला. कंपनीच्या प्रतिनिधी सौ. इंद्रायणी यांनी तातडीने दखल घेत या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
विशेष कार्यक्रमात निधी सुपूर्द
निधी हस्तांतरण आणि कामाच्या शुभारंभानिमित्त तिवडी गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई (पाटील), कंपनीच्या प्रतिनिधी सौ. इंद्रायणी, वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कृष्णा इरमले, राहुल गुंठे, कंपनीचे प्रतिनिधी सुमित महाजन, विद्यमान सरपंच, माजी सरपंच प्रकाश पवार, ग्रामविकास अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वन विभाग आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या समन्वयातून साकारलेल्या या उपक्रमामुळे तिवडी गावातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा निर्माण झाली असून, ग्रामस्थांनी वन विभाग आणि संबंधित कंपनीचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

