(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
शहरातील वाशिष्ठी नदीवरील बाजारपुलावरून २४ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रभर शोधमोहीम राबविली; मात्र यश आले नाही. अखेर रविवारी सकाळी काही अंतरावर संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव रिझवान गयासुद्दीन परकार (२४, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) असे आहे. शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिझवान हा बाजारपुलावर आला. पुलावर त्याने स्वतःच्या चप्पल आणि हातातील घड्याळ बाजूला ठेवले आणि त्यानंतर थेट वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नदीत शोधमोहीम सुरू केली. मात्र, नदीच्या वेगवान प्रवाहासह रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. जवळपास दोन तास प्रयत्न करूनही रिझवानचा ठावठिकाणा लागला नाही.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी पुलापासून काही अंतरावर रिझवानचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, रिझवानने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून, सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

