(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर दुर्दैवी शेवट झाला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर कोळकेवाडी धरण परिसरातील हसरेवाडी स्मशानभूमी लगत त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला. या घटनेमुळे चिपळूणसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चार पानी सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे.
मुकुंद पालांडे हे अलोरे गावचे रहिवासी असून, चिपळूण शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी (२१ मेच्या दुपारपासून ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चार पानी पत्रात त्यांनी बँकेतील काही कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ, दबाव आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या मानसिक त्रासाला कंटाळून आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केल्याने बँक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, बेपत्ता झाल्यानंतर काही तासांतच कोळकेवाडी कॅनॉल परिसरात त्यांची दुचाकी संशयास्पद अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली होती. चिपळूणहून विशेष बोट मागवून कॅनॉल आणि धरण परिसरात शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अखेर तीन दिवसांनी हसरेवाडी स्मशानभूमी लगत धरण परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे मुकुंद पालांडे यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी सुसाईड नोटच्या आधारे शिरगाव पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, सुसाईड नोटमधील प्रत्येक मुद्द्याची बारकाईने चौकशी केली जात आहे.
बातमी वाचा : एचडीएफसी बँकेचा डेप्युटी मॅनेजर बेपत्ता; चार पानी पत्रात सहकाऱ्यांवर गंभीर आरोप, चिपळूण हादरले
यापूर्वीही मुकुंद यांनी दोन दिवसांपूर्वी विरेश्वर तलाव परिसरात काही तरुणांकडून मारहाण झाल्याचा उल्लेख पत्रात केला होता. त्या घटनेत एका परिचित पोलिसाच्या मध्यस्थीने प्रकरण मिटवण्यात आल्याचेही त्यांनी लिहिले होते. त्यामुळे या संपूर्ण घटनेमागे नेमके कोणते दबाव आणि कारणे होती, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. मुकुंद पालांडे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चिपळूण शहरात दिवसभर या घटनेची चर्चा रंगली होती. मानसिक छळ, कामाचा ताण आणि कार्यस्थळी होणाऱ्या दबावाच्या प्रश्नांकडे या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीरपणे पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

